विद्यापीठ मराठी विभागात ‘मराठी भाषा गौरव दिना’चे आयोजन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सक्षम भारतीय वार्ता
नागपूर २८ : प्रकाशपूजेजा पुरस्कार करणारे कवी कुसुमाग्रज हे खऱ्या अर्थाने अग्निसंप्रदायाचे कवी होते, असे प्रतिपादन वर्धा येथील यशवंत महाविद्यालयातील प्राध्यापक, कवी-समीक्षक डॉ. प्रमोद नारायणे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागात ‘मराठी भाषा गौरव दिन’ अर्थात कविवर्य-लेखक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जयंतीदिनानिमित्त शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाच्या मराठी विभागात आयोजित या विशेष व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख (अतिरिक्त कार्यभार) व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जांभूळकर होते. व्याख्याते म्हणून वर्धा येथील यशवंत महाविद्यालयातील प्राध्यापक,कवी-समीक्षक डॉ. प्रमोद नारायणे, डॉ. अमृता इंदूरकर यांची उपस्थिती होती. ‘मराठी भाषा व साहित्याच्या जडणघडणीत वि. वा. शिरवाडकर यांचे योगदान’ या विषयावर बोलताना डॉ. प्रमोद नारायणे यांनी ‘कविवर्य कुसुमाग्रजांनी आवर्तात सापडलेल्या रविकिरण मंडळाच्या कवितेतील साचलेपणाला बाहेर काढून त्याला नवे धुमारे फोडण्याचे काम ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून केले असल्याचे सांगितले. ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ लिहून त्यांनी प्रेमाच्या एकआयामी रूढ प्रतिकांना बहुप्रतिकात्मक केले. ‘कविवर्य कुसुमाग्रज हे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असून त्यांनी काव्य, नाटक, भाषांतर, अनुवाद, पत्रकार-संपादक, अशा विविध भूमिका लिलया पेलल्या. त्यांनी हाताळलेल्या प्रत्येक साहित्यप्रकाराला त्यांनी रूढ साचेबद्ध चौकटीतून बाहेर काढत नव्या प्रतिमा-प्रतिकांसोबत आशयाच्या संदर्भानेही समृद्ध केले. एकूणच मराठी साहित्याला समृद्ध करतानाच कविवर्य कुसुमाग्रजांनी मराठी कवितेला क्रांतिवाद, मानवतावाद आणि भूतदयावाद दिला असल्याचे डॉ. नारायणे म्हणाले. विज्ञान प्रतिमांना त्यांनी आपल्या साहित्यकृतींच्या माध्यमातून वाङ्मयाच्या क्षेत्रात प्रभावी वापर केला. यामुळेच स्वित्झर्लंडच्या ‘इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री’ने अवकाशातील एका ताऱ्याला ‘कुसुमाग्रज तारा’ असे नाव दिले’, असे गौरवोद्गारही डॉ. प्रमोद नारायणे यांनी यावेळी काढले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. विकास जांभूळकर यांनी, भावनांचा शोध घेणे हे साहित्याचे काम असते याकडे लक्ष वेधत, ‘भाषेतून आपण अर्थ प्रवाहित करीत असतो. मात्र, अर्थ नेहमीच परिपूर्ण नसतात, तर आपण आपल्या भाषेच्या आकलनातून शब्दांचे अर्थ लावत असतो. भाषा आणि साहित्य हे सर्वांच्या संवेदना समजून घेत भूमिका घेण्याच्या दिशा दर्शवित असतात’, असे सांगितले.

सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा दुधे यांनी केले. आयोजनासाठी प्रा. समीर कुमरे, डॉ. प्रज्ञा निनावे, प्रा. मनोजकुमार कोसारे, प्रा. तुसीदास भोयर आदींनी परिश्रम घेतले. व्याख्यान कार्यक्रमाला विद्यार्थी, संशोधक, तसेच प्राध्यापक व अभ्यासकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें