सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता.२९ : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील हा विजय माझा एकट्याचा नसून, माझ्यावर विश्वास व्यक्त करणाऱ्या प्रत्येक पदवीधराचा, काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या एकजुटीचा विजय आहे. लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवून परिवर्तनाच्या बाजूने उभ्या राहिलेल्या सर्व मतदारांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
गेल्या सहा वर्षांत पदवीधरांचे प्रश्न विधान परिषदेत सातत्याने मांडण्याचा आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या निवडणुकीतील जनादेश म्हणजे त्या कामाची पोचपावती आणि आगामी काळात अधिक जबाबदारीने काम करण्यासाठी मिळालेली प्रेरणा आहे.
बेरोजगार पदवीधरांना रोजगाराच्या संधी, युवकांच्या प्रश्नांना न्याय, शिक्षण क्षेत्रातील समस्या, नोकरभरती, जुनी पेन्शन योजना आणि कर्मचारी वर्गाच्या विविध मागण्यांसाठी माझा लढा यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील.
हा विजय म्हणजे केवळ एका उमेदवाराचा विजय नसून, पदवीधरांच्या अपेक्षांचा आणि लोकशाहीतील जनशक्तीचा विजय आहे. काँग्रेस, महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक-कर्मचारी संघटना आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मी मनःपूर्वक आभार मानतो. जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार
















