सक्षम भारत वार्ता
नागपूर ता.१० : २०१३ साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत बॉक्स ऑफिसवर मोठा गाजावाजा केला होता. श्रद्धा विरुद्ध विज्ञान यांचा संगम असलेल्या या चित्रपटाने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. तब्बल ११ वर्षांनंतर प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद २’ या बहुचर्चित सिक्वेलनेही प्रदर्शित होताच मराठी चित्रपटसृष्टीत ब्लॉकबस्टर एन्ट्री करत प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवला आहे.
राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये पहिल्या दिवसापासून शो हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, नागपूर, जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ‘देऊळ बंद २’ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. या भागातील अनेक थिएटरचे सर्व शो हाऊसफुल्ल होत असून, तिकीट खिडक्यांवर गर्दी होत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३.०५ करोडची धमाकेदार कमाई करून नवा इतिहास रचला आणि फक्त १९ दिवसात ७० कोटींपेक्षा जास्त कमाईचा विक्रम करत घोडदौड सुरू आहे.
सोशल मीडियावरही ‘देऊळ बंद २’ची जोरदार चर्चा रंगली असून, प्रेक्षकांनी चित्रपटातील संवाद, दमदार कथानक, भावनिक प्रसंग, संगीत आणि कलाकारांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले असून महाराष्ट्रातील छोट्या गावांपासून ते मोठ्या शहरांमधील मल्टिप्लेक्सपर्यंत सर्वत्र प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांपासून ते शहरी भागातील तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत समाजातील सर्व स्तरांतील प्रेक्षक सहकुटुंब या चित्रपटाला गर्दी करत आहेत. वाढत्या मागणीमुळे राज्यभरातील सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटासाठी ‘हाउसफुल्ल’चे बोर्ड झळकत असून, तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कामगिरी भक्कम सुरू आहे.
वटवृक्ष इंटरटेनमेंट निर्मित “देऊळ बंद २” चे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले असून या भव्य चित्रपटाची निर्मिती कैलास वाणी, सौ. जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे. चित्रपटात मोहन जोशी आणि स्नेहल तरडे प्रमुख भूमिकेत असून महेश मांजरेकर, सविता मालपेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, ओम भुतकर, संस्कृती बालगुडे, जगन्नाथ निवंगुणे, देवेंद्र गायकवाड, रमेश परदेशी, केदार सोमण, अतुल कुडले, मुकुंद वसुले आणि प्रविण तरडे महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
आज नागपूर येथे जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या विशेष उपस्थितीतीत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत निर्माते कैलाश वाणी, लेखक-दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, नागपूर येथील अभिनेते मुकुंद वसूले व तंत्रज्ञ संकेत धोटकर तसेच लीड मीडिया पीआर आणि मार्केटिंगचे कुशल कोंडे, अनुप गोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
उत्कृष्ट छायांकन, प्रभावी पार्श्वसंगीत आणि भव्य सादरीकरणामुळे चित्रपट अधिक उठावदार ठरला आहे. प्रदर्शित होताच मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील यंदाचा सर्वाधिक चर्चेत असलेला आणि ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला असल्याची चर्चा चित्रपट वर्तुळात सुरू झाली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील गाजत असलेला ‘देऊळ बंद 2 : आता परीक्षा देवाची…’ या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे आणि त्यांच्या संपूर्ण चमूने आज सकाळी नागपूरच्या खाद्यसंस्कृतीची खास ओळख असलेल्या प्रसिद्ध तर्री पोह्यांचा आस्वाद घेत चित्रपटाच्या घवघवीत यशाचा आनंद साजरा केला. नागपूर दौऱ्यावर आलेल्या चित्रपटाच्या टीमने स्थानिक नागरिकांशी संवाद साधत तर्री पोह्यांची चव अनुभवली.












