सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

क्यूआर कोड असलेले जन्म प्रमाणपत्र मिळण्यात विलंब; नागरिक त्रस्त

सक्षम भारत वार्ता
नागपूर, दि. २२ जून : नागपूर महानगरपालिके कडून (एनएमसी) क्यूआर कोड (डिजिटल) असलेले जन्म प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे. मागील काही महिन्यांपासून एनएमसी मुख्य कार्यालय तसेच विविध झोन कार्यालयांमध्ये क्यूआर कोडयुक्त जन्म प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध न होता नागरिकांना एक- एक महिन्यानंतरच्या तारखा दिल्या जात असल्याने पालक व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सध्या शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असून प्रवेश प्रक्रिया, विविध शासकीय कामे तसेच क्रीडा स्पर्धांसाठी क्यूआर कोड असलेले जन्म प्रमाणपत्र आवश्यक ठरत आहे. मात्र, महानगरपालिकेच्या दिरंगाईमुळे अनेक पालकांना वारंवार कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. संबंधित विभागाकडे चौकशी केली असता काम बंद नसल्याचे सांगितले जात असले तरी विलंबाचे नेमके कारण स्पष्ट करण्यात येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

ज्या जन्म प्रमाणपत्रांमध्ये कोणताही बदल किंवा दुरुस्ती आवश्यक नाही आणि केवळ क्यूआर कोडयुक्त प्रत हवी आहे, अशा नागरिकांना ती तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी विधानसभा संघटक विशाल कोरके यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना विशाल कोरके यांनी सांगितले की, त्यांची कन्या सह्याद्री विशाल कोरके हिची विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या १५ वर्षांखालील (अंडर-१५) गटाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. पुढील निवड प्रक्रियेसाठी क्यूआर कोड असलेले जन्म प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जन्म प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ३० जून असून, मनपाकडून प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्यास पात्र खेळाडूंना अपात्र ठरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना क्यूआर कोडयुक्त जन्म प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

(अधिक माहितीसाठी विशाल कोरके यांच्या मोबाईल क्रमांकावर शहानिशा करावी ९८२२९२१२७८)

Leave a Comment

Read More