महापौर नीताताई ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार
सक्षम भारत वार्ता
नागपूर : महानुभाव पंथातील थोर ज्ञानवंत माहूर पीठाचे कवीश्वराचार्य गुरुवर्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती निमित्त अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता. कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर येथे करण्यात आले आहे. अभिष्टचिंतन आयोजन समिती आणि नागपूर जिल्हा महानुभाव परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री देवदेवेश्वर श्री दत्त मंदिर, माहूरचे संचालक कवीश्वराचार्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. घोटी (नाशिक) येथील महानुभाव आश्रमाचे संचालक उपाध्य कुलभूषण आचार्य श्री पूजेदकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.

सोहळ्याचे उद्घाटन उपाध्य कुलाचार्य महंत श्री वर्धनश्य बिडकर बाबा यांच्या शुभहस्ते होणार असून, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या महापौर मा. नीताताई ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी अजिंठा निवासी आचार्य प्रवर महंत श्री रिद्धूपुरकर बाबा शास्त्री आणि रिद्धपूर निवासी आचार्य प्रवर महंत श्री गोपीराज बाबा शास्त्री यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
‘व्रतस्थ’ स्मरणिकेचे प्रकाशन माहूरकर बाबा शास्त्री यांनी अशोकांची व रुग्ण संतजनांची सेवा, मंदिर जीर्णोद्धार, ग्रंथ प्रकाशन यांसह विविध सामाजिक व धार्मिक कार्यांत योगदान दिले आहे. ज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचणारे, निष्कलंक चारित्र्य आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘व्रतस्थ’ या गौरवपर स्मरणिकेचे विमोचन फलटण निवासी कवीश्वर कुलाचार्य महंत श्री विद्रांस बाबा यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक व चिंतनशील आचार्य श्री बाबुळगावकर बाबा शास्त्री यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आचार्य श्री न्यायव्यास बाबा शास्त्री उपस्थित राहणार आहेत. तसेच स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याच्या नगररचना विभागाचे माजी संचालक श्री एन. आर. शेळे यांची उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतून ज्ञानसंपन्न संत-महंत, महानुभाव पंथाचे अनुयायी तसेच मान्यवर या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. असे पत्रकार परिषदेमध्ये पुरुषोत्तम ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी तुषारराव ढगे, आनंदराव गजभिये, गोविंदराव ठाकरे, आणि लालचंदजी वंजारी यांची उपस्थिती होती.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार

















