राजे रघुजी नगरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न; शिवसेना महिला आघाडी आक्रमक
सक्षम भारत वार्ता
नागपूर : प्रभाग क्रमांक ३१, राजे रघुजी नगर, सोमवार पेठ येथील आरोग्य केंद्राचे काम सुरू होऊनही ते पुन्हा बंद पडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शिवसेना महिला आघाडीने सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, काम पुन्हा ठप्प झाल्याने हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिवसेना महिला आघाडीच्या पाठपुराव्यामुळे सदर आरोग्य केंद्राच्या कामाला सुरुवात झाली होती. या केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे काम रखडणे नागरिकांच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे शिवसेना महिला आघाडीने म्हटले आहे.
या प्रश्नाकडे तातडीने लक्ष वेधण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. मनीषा पापडकर यांच्या नेतृत्वाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख मंजुषा पानबुडे, उपजिल्हाप्रमुख सुषमा इंगोले, विधानसभा संघटक नैना दीक्षित आणि उपजिल्हाप्रमुख मनीषा पराड़ उपस्थित होत्या.
“आरोग्य केंद्राचे काम कोणत्याही कारणाने रखडता कामा नये. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेले हे काम तातडीने सुरू करून निर्धारित वेळेत पूर्ण करावे,” अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
आरोग्य केंद्राचे काम तातडीने सुरू करून ते पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी शिवसेना महिला आघाडीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे सौ. मनीषा पापडकर यांनी स्पष्ट केले.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार















