मतदानाचे आवाहन करणारे काँग्रेस, मविआच्या नेत्यांचे व्हिडिओ व्हायरल
सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता.21 : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत गोविंदराव वंजारी यांच्या प्रचाराने सोशल मीडियावर वेग घेतला आहे. मतदानाचे आवाहन करणारे काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचे व्हिडिओ विविध समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात डिजिटल प्रचारावर विशेष भर दिला जात आहे.
मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेते, लोकप्रतिनिधी तसेच विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व्हिडिओंच्या माध्यमातून पदवीधर मतदारांशी संवाद साधत आहेत. वंजारी यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन या व्हिडिओंमधून केले जात आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, वर्धेचे खासदार अमर काळे, आमदार सुधाकर अडबाले, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी राज्यमंत्री रणजीत कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी वंजारी यांच्या समर्थनार्थ मतदानाचे आवाहन केले आहे.
याशिवाय, काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे, नागपूर जिल्हाध्यक्ष अश्विन बैस, प्रदेश काँग्रेसचे महासचिव गिरीश पांडव, प्रदेश महासचिव कुंदा राऊत, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे आणि गोंदिया जिल्हाध्यक्ष अमर वराडे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व संस्थांच्या प्रतिनिधींनीही वंजारी यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
डिजिटल माध्यमांतून मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रत्यक्ष प्रचारासोबतच डिजिटल माध्यमांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्यावर महाविकास आघाडीकडून भर दिला जात आहे. नेत्यांचे आवाहन करणारे व्हिडिओ, प्रचाराचे संदेश आणि उमेदवाराच्या समर्थनार्थ तयार करण्यात आलेला मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित केला जात आहे. त्यामुळे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील सोशल मीडिया प्रचाराची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार














