सक्षम भारत वार्ता
नागपूर,ता.२४ : पावसातील मोठे खंड व प्रतिकूल हवामानामुळे नागपूर जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, धान व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष श्री.विशाल बडगे यांचा प्रमुख उपस्थित शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष लोकेश कामडी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे व कागदपत्रांच्या फेऱ्यात न अडकवता तातडीने मदत द्यावी. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ₹१ लाख, हंगामी बागायतदारांना ₹१.५० लाख व बागायतदारांना ₹२ लाख मदत द्यावी .
तसेच शेतकऱ्यांना कर्जसवलत, पीकविमा नुकसानभरपाई, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर, पशुधनासाठी चारा-पाणी, नादुरुस्त रोहित्रांची तातडीने दुरुस्ती आणि शेतकरी व शेतमजुरांना विशेष मदत द्यावी .
“शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा शेतकरी हितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा लोकेश कामडी यांनी दिला.
यावेळी शहर सचिव श्री. घनश्याम निघाडे, शहर उपाध्यक्ष गौरव पुरी, भिवापूर तालुका अध्यक्ष राकेश पौनीकर, दिनेश मांगलेकर, भूषण ढोबळे आदी पदाधिकारी व मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार

















