सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

सायबर जनजागृती महिन्यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र

सक्षम भारत वार्ता
नागपूर : सायबर जनजागृती महिन्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल सुरक्षितता आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एडुसन फाऊंडेशनच्या वतीने ‘मिशन सायबर फिट इंडिया’ अंतर्गत यशवंत उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, ओंकारनगर, नागपूर येथे ७ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष सायबर जनजागृती व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी सायबर सेलच्या आचल चित्तारी आणि एडुसन फाऊंडेशनचे संचालक निलेश काळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संचालक व संस्थापक श्री. मधुकर दळवेकर होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा वाघमारे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.

श्रीमती आचल चित्तारी यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक व संदेश, APK फाईल्स, सोशल मीडिया, डिजिटल अरेस्ट, सायबर बुलिंग, पासवर्ड सुरक्षितता तसेच वैयक्तिक माहितीचे संरक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच गेमिंग ॲप्स आणि लोन ॲप्सच्या माध्यमातून होणाऱ्या संभाव्य फसवणुकीपासून विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे सावध राहावे, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

एडुसन फाऊंडेशनचे संचालक निलेश काळे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल व डिजिटल माध्यमांचा अतिरेक टाळून वाचनाची सवय, प्रत्यक्ष संवादकौशल्य आणि सामाजिक सहभाग विकसित करण्याचे आवाहन केले. संशयास्पद फोन, संदेश किंवा ऑनलाइन संपर्क प्राप्त झाल्यास त्याला तत्काळ प्रतिसाद न देता पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तींना माहिती द्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. सायबर फसवणुकीच्या प्रसंगी घाबरून कोणतीही घाईची कृती करू नये आणि स्वतःला एकटे न ठेवता तातडीने विश्वासू व्यक्तीची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

अभ्यासामध्ये ChatGPT आणि इतर AI साधनांचा वापर करताना विद्यार्थ्यांनी स्वतःचा विचार, वाचन, लेखन, विश्लेषण आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन निलेश काळे यांनी केले. तंत्रज्ञानाचा वापर हा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला पूरक असावा, यावर त्यांनी विशेष भर दिला.

प्रश्नोत्तर सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले. मार्गदर्शकांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून सुरक्षित डिजिटल वर्तनाबाबत आवश्यक सूचना दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा आणि जबाबदार डिजिटल नागरिकत्वाची शपथ घेतली. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी एडुसन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More