सक्षम भारतीय वार्ता
नागपूर, ता. 26 : उन्हाच्या तीव्र चटक्यांसाठी प्रसिद्ध असलेला नवतपा सोमवारपासून (ता. २५) सुरू झालेला आहे. नवतपाच्या नऊ दिवसांमध्ये उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असून, पारा ४७ अंशापार जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी उष्माघाताचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता असल्यामुळे भरदुपारी घराबाहेर पडणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. २५ मे ते २ जून हा नऊ दिवसांचा काळ नवतपा नक्षत्रात म्हणून ओळखला जातो. सोमवारपासून सूर्य रोहिणी प्रवेश करीत असून, दिवस मोठा असणार आहे. साधारणपणे या दिवसांमध्ये सूर्यापासून येणारी ऊर्जा अधिक काळ पृथ्वीवर राहाते. शिवाय सूर्य पृथ्वीच्या जवळ येतो.
सूर्यकिरणे सरळ पृथ्वीवर पडत असल्याने उन्हाचे चटके अधिकच जाणवतात. परिणामतः कमाल तापमानात मोठी वाढ होते. नवतपामध्ये भारतातील जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवते. यावेळीदेखील सूर्य आग ओकणार असून कडक ऊन राहण्याची दाट शक्यता आहे.
या दिवसात ही काळजी घ्या
* या दिवसांमध्ये हलका नाश्ता करूनच घराबाहेर पडावे.
* शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत फिरणे टाळावे.
* सोबत नेहमी पाण्याची बॉटल किंवा कांदा ठेवावा.
* दिवसभर अधूनमधून पाणी प्यावे.
* लिंबू पाणी, मष्ठा, लस्सी, आंब्याचे पन्हे इत्यादींचे सेवन करावे.
* बाहेर पडताना दुपट्टा, स्कॉर्प, टॉवेल, टोपी व गॉगलचा वापर करावा.
* शक्यतो घाम सोकून घेणारे पांढरे सुती, सैल व नरम कपडे घालावे.
* ऊन लागल्यास, अस्वस्थ वाटत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
भर उन्हात घराबाहेर पडणे धोकादायक
नवतपामध्ये असह्य ऊन व उकाड्यामुळे तब्येतीवरदेखील विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनीही सतर्कतेचा इशारा दिला आहे. या दिवसांत कडक ऊन तापत असल्यामुळे प्रत्येकाने स्वतःसह आपल्या कुटुंबियांची आवश्यक काळजी घेणे खूप गरजेचे असते. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच सवयी, राहणीमान, खानपान या गोष्टींकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
विक्रमी उसळी घेतल्याचे नागपूरकरांनी यापूर्वी अनुभवले आहे. उल्लेखनीय म्हणजे, हवामान विभागानेही आगामी काळात पारा ४६-४७ अंशांच्या पार जाण्याचे यापूर्वीच संकेत दिले आहेत. त्यामुळे नवतपाच्या काळात लहानथोरांसह सर्वांनाच सतर्क राहण्याची गरज आहे.












