सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता.२९-७-२०२६ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले अध्यासनाचे औपचारिक उद्घाटन माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या शुभहस्ते सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी करण्यात आले. एलएडी चौक येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर परीसरातील महात्मा गांधी विचारधारा विभागाच्या इमारतीत महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांना माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्यासह उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करीत आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मंगला हिरवाडे, अध्यासन सल्लागार मंडळाचे सदस्य डॉ. सुजित मेत्रे, अधिसभा सदस्य श्री. दिनेश शेराम, आजिवन अध्ययन व विस्तार विभाग संचालक डॉ. समीत माहोरे , विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. विजय तांगडे, मराठी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे तसेच अध्यासन प्रमुख (अतिरिक्त कार्य) प्रा. प्रमोद वाटकर यांची उपस्थिती होती. सल्लागार मंडळाच्या बैठकीत सदस्यांनी अध्यासनाचा संबंधित विविध विषयांवर आपले विचार मांडले. मंडळाच्या अध्यक्षा तथा माननीय कुलगुरू महोदयांनी अध्यासनाला अनुरूप इमारत, फर्निचर तसेच ग्रंथ सुसज्जता याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अध्यासनाच्या मार्फत आगामी कालावधीत चालविण्यात येणारे उपक्रम, शॉर्ट टर्म कोर्सेस, अभ्यासक्रम, इंटर्नशिप, स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व इतर सुविधा देणे, स्थानिक व राज्यस्तरीय तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन प्राप्त करणे यांसंबंधीत निर्देश दिले. त्यासोबतच अध्यासनाला आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती संबंधित त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महात्मा गांधी विचारधारा विभाग परिसरात माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर व प्रमुख अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.











