सक्षम भारत वार्ता
नागपूर,दि.२६ जून : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नागपूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) पदावर अमित सुधाकरराव सवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाच्या सामाजिक, संघटनात्मक आणि समाजहिताच्या कार्यात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अमित सवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय सरचिटणीस प्रमोदराव जाधव यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी विदर्भ प्रांत निरीक्षक व राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार, नागपूर विभागीय अध्यक्ष नरेंद्र मोहिते तसेच महासंघाचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
महासंघाने दिलेल्या नियुक्तीपत्रानुसार, अमित सवडे यांची “नागपूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष” म्हणून एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली असून, नागपूर ग्रामीण जिल्ह्यात संघटनेचा विस्तार व बळकटीकरण करणे, नवीन सदस्य नोंदणी करणे, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणे तसेच लोकसहभाग वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
कार्यक्रमादरम्यान समाजहिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच नागपूर जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार, युवक व शहर कार्यकारिणीची पुनर्नियुक्ती यासंदर्भात लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. अखिल भारतीय मराठा महासंघा च्यावतीने अमित सवडे यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.












