सक्षम भारत वार्ता
बहादुरा, ता .08 : पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील एका शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहातून 11 वर्षीय मुलगी कोणालाही न सांगता निघून गेल्याची माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे हुडकेश्वरच्या पथकाने तात्काळ शोधमोहीम हाती घेतली.
प्राथमिक चौकशीत संबंधित मुलगी वसतिगृहात नव्याने दाखल झाली होती. वसतिगृहात राहण्याची इच्छा नसल्याने ती कोणालाही न सांगता तेथून निघून गेल्याचे निष्पन्न झाले. मुलीकडे मोबाईल अथवा संपर्काचे कोणतेही साधन नसल्याने तिचा शोध घेणे आव्हानात्मक होते.
माहिती मिळताच पोलीस ठाणे हुडकेश्वरच्या अधिकारी व अंमलदारांनी वेळ न दवडता शोधकार्य सुरू केले. मुलगी कोणत्या दिशेने जाऊ शकते, कोणत्या मार्गाचा वापर करण्याची शक्यता आहे, याचा अभ्यास करून विविध रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे व संभाव्य परिसरात कसून शोध घेण्यात आला.
या शोधमोहीमेत बीट मार्शल पथक तसेच बेपत्ता व्यक्ती प्रकरणाचा कारभार पाहणारे हेड कॉन्स्टेबल दीपक मोरे यांनी अत्यंत तत्परता, चिकाटी व कौशल्याने काम करून अल्पावधीत संबंधित मुलीचा सुखरूप शोध लावला. त्यानंतर मुलीला सुरक्षित ताब्यात घेऊन तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
हुडकेश्वर पोलिसांच्या तातडीच्या प्रतिसादामुळे व प्रभावी शोधमोहीमेमुळे बेपत्ता अल्पवयीन मुलीचा अल्पावधीत सुखरूप शोध लागला असून, या कार्याबद्दल संबंधितांनी पोलीस ठाणे हुडकेश्वरचे आभार व्यक्त केले आहेत.












