विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ.
सक्षम भारत वार्ता
बहादुरा, ता.७ जुलै : अभिनंदन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी करून गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळाले आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सभापती नरेंद्र नांदुरकर व बालू घोडमारे, गटनेते नितीन शेळके उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.राम कावडकर, उपाध्यक्ष डॉ. सचिन जिभाकाटे, सचिव डॉ.अवध द्विवेदी, डॉ. देवेंद्र बेलखेडे,डॉ. इम्राहिम,अर्चना कावडकर, सोनम द्विवेदी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना बोबडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले.
सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांकडे लक्ष देणाऱ्या अभिनंदन बहुउद्देशीय संस्थेच्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक व नागरिकांनी कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून शिक्षणाविषयीची आवड वाढण्यास मदत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.












