सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या राख्यांनी पोलिस बांधवांच्या मनगटावर सजला विश्वासाचा धागा

सक्षम भारत वार्ता
नागपूर : रक्षाबंधनाच्या पारंपरिक सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत मोरया फाउंडेशनच्या वतीने हुडकेश्वर पोलिस स्टेशन येथे विशेष रक्षाबंधन उपक्रम घेण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बांधून त्यांच्या सेवाभावाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

‘राखी विश्वासाची, बंध संरक्षणाचा’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला एसीपी चंदा दंडवते यांची प्रमुख उपस्थिती होती. मोरया फाउंडेशनच्या सदस्यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी सण- उत्सवाच्या काळातही अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या या त्यागाची आणि सेवाभावाची जाणीव ठेवून त्यांच्याप्रती आदर, विश्वास व कृतज्ञता व्यक्त करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितले.

यावेळी मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका रजनीताई अविनाश चौहान यांनी सांगितले की, रक्षाबंधन हा केवळ भाऊ- बहिणीच्या नात्याचा सण नसून समाजाच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. पोलिस बांधवांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्याप्रती सन्मान व विश्वास व्यक्त करणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमामुळे पोलिस कर्मचारी आणि फाउंडेशनच्या सदस्यांमध्ये आत्मीय वातावरण निर्माण झाले. नागरिक आणि पोलिस यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनीही कौतुकपूर्वक सांगितले.

कार्यक्रमाला संध्या कठमुसरे, वृषाली कुबडे, माधुरी इत्तडवार, लता डायरे, सविता तडस, नेहा मगर, गौरी डफ, पूर्वा पांगुळ, ज्योती नागपूरकर यांच्यासह मोरया फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांमधून पोलिस बांधवांच्या सेवेला मानाचा मुजरा करत सामाजिक एकोपा, विश्वास आणि कृतज्ञतेचा संदेश देण्यात आला.

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More