सुमारे १५० बालस्पर्धकांचा सहभाग; वेशभूषा व नंदीबैल सजावटीने वेधले लक्ष
सक्षम भारत वार्ता
नागपूर,ता.१२ : अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगठन, भारत आणि प्रतिभा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य तान्हा पोळा स्पर्धेचे २७ वे वर्ष उत्साहात पार पडले. महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीची ओळख बालकांना व्हावी, तसेच त्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा सुमारे १५० बालस्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेत बालकांनी आकर्षक पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. तसेच नंदीबैलांची कलात्मक सजावट करून विविध सामाजिक संदेशही सादर करण्यात आले. वेशभूषा, नंदीबैल सजावट, सादरीकरण आणि सामाजिक संदेश या विविध निकषांवर परीक्षकांनी विजेत्यांची निवड केली. स्पर्धेतील प्रथम पुरस्कार सायकल आर्वीक तायवाडे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार व्ही.एन. रेड्डी यांच्या सौजन्याने देण्यात आला. द्वितीय पुरस्कार स्टडी टेबल आहाना इंदूरकर, तृतीय पुरस्कार चेअर ओवी देशमुख, चतुर्थ पुरस्कार क्रिकेट बॅट शिवांश सार्वे, पंचम पुरस्कार बॅडमिंटन रॅकेट दानीष गायकवाड आणि षष्ठम पुरस्कार फुटबॉल प्रभो दवंडे यांना देण्यात आला. सहभागी इतर बालकांनाही विविध आकर्षक पुरस्कार देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक विवेक मेंढी होते. कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून रोहित श्रीवास्तव आणि मनोज लिल्होरे यांनी जबाबदारी सांभाळली. यावेळी व्ही.एन.रेड्डी, अनुसया गुप्ता, अभय देशमुख, नगरसेवक दिलीप दिवे, नगरसेवक संजय उगले, माजी नगरसेवक प्रमोद तभाने तसेच प्रियासिंग चंदेल आणि सौ. आशिया हांडा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. २७ वर्षांपासून सातत्याने आयोजित होणाऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून बालकांमध्ये महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि सामाजिक जाणीव रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाच्या स्पर्धेलाही बालकांसह पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक, पालक आणि नागरिकांचे आयोजक विवेक मेंढी यांनी आभार मानले.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार
















