सर्वधर्मीय धर्मगुरू, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग
सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता.१३ : डी.जे.चा वापर कायमस्वरूपी बंद करावा आणि ध्वनिप्रदूषणासंदर्भातील न्यायालयीन निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या जनचळवळीचा आणखी एक टप्पा म्हणून रविवारी नागपुरात मूक मार्चचे आयोजन करण्यात आले. भर पावसातही या मार्चला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विविध धर्मांचे धर्मगुरू, ज्येष्ठ नागरिक, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी, रुग्णालयातील कर्मचारी तसेच विविध सामाजिक व स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चात माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी, TRAW चे नितीश चौधरी, फादर जोसेफ, भंते प्रज्ञानंद महाथेरो, इमाम आतिक कुरेशी, आय.एम. ए. महाराष्ट्राच्या अध्यक्ष डॉ. मंजुषा गिरी, सी. ए.जी. नागपूरचे विवेक रानडे, विष्णू मनोहर, क्रीडा प्रतिनिधी अशफाक शेख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले. मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि हिंदू धर्मगुरूंची उपस्थिती हे या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. कोणत्याही धर्माला, उत्सवाला अथवा राजकीय पक्षाला विरोध नसून ध्वनिप्रदूषणापासून नागरिकांना मुक्ती मिळावी, हा या जनचळवळीचा मुख्य उद्देश असल्याचा संदेश मोर्चातून देण्यात आला.
मोर्चात सहभागी नागरिकांनी तोंडावर पट्ट्या बांधून मूकपणे आपली भूमिका मांडली. ‘न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करा’, ‘भविष्यात डी.जे. कायमस्वरूपी बंद करा’, ‘आमचा कोणत्याही धर्माला, उत्सवाला किंवा राजकीय पक्षाला विरोध नाही’, अशा आशयाचे फलक सहभागींच्या हातात होते. घोषणाबाजी न करता शांततेच्या मार्गाने नागरिकांनी आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविला.
या मूक मोर्चाचे आवाहन TRAW या संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. त्याला CAGF, Indian Medical Association, Together We Can, Dr. Babasaheb Ambedkar Institute of Management Studies, ज्येष्ठ नागरिक मंडळ, विविध सायकलिंग क्लब यांसह अनेक सामाजिक संस्था, संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला.
डी.जे.च्या अतितीव्र आवाजामुळे केवळ ध्वनिप्रदूषणच होत नसून त्याचा परिणाम ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे हा विषय कोणत्याही धर्माशी किंवा उत्सवाशी जोडण्याऐवजी नागरिकांच्या आरोग्याचा, शांततेचा आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न म्हणून पाहावा, अशी भूमिका जनचळवळीचे नेतृत्व करणार माजी आमदार, माजी महापौर संदीप जोशी यांनी यावेळी मांडली.
न्यायालयाने ध्वनिप्रदूषणासंदर्भात दिलेल्या निर्देशांचे प्रशासनाने कठोरपणे पालन करावे आणि डी.जे.वरील बंदी कायमस्वरूपी लागू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मार्च मध्ये राजेश दाचेवार, तुषार कोठारी, प्रवीण मोहोड़, सचिन असवार, विवेक वैद्य आदी सहभागी झाले होते.
या जनचळवळीत सहभागी झालेल्या सर्व संघटना, धर्मगुरू, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्णालयातील कर्मचारी आणि नागपूरकरांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार
















