सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

तीतूर ग्रामपंचायतीत ‘ग्रामसभेच्या प्रोसिडिंग’वरून खळबळ!

ग्रामसभा अर्धवट; प्रोसिडिंग बुक शाळेत नेऊन नोंदी केल्याचा आरोप — वैयक्तिक UPI, IPPB स्कॅनरवरून शुल्कवसुलीचाही ग्रामस्थांचा दावा

सक्षम भारत वार्ता
तितूर, ता.२० : ग्रामसभा ही गावाच्या कारभारातील सर्वोच्च लोकशाही संस्था मानली जाते. मात्र, गट ग्रामपंचायत तीतूर येथे ग्रामसभेच्या प्रोसिडिंग बुकवरून गंभीर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. ३ सप्टेंबर रोजी झालेली ग्रामसभा अर्धवट राहिल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी प्रोसिडिंग बुक नागेश्वर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कक्षात नेऊन संगणक ऑपरेटर अमित बबन मानकर हे नोंदी करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकाराचा व्हिडिओही ग्रामस्थांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.

तितूर : निवेदन देतांना ग्रामस्थ,स्वीकारताना गट विकास अधिकारी स्वप्नील मेश्राम.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ३ सप्टेंबर रोजी ग्रामसभा सुरू असताना ग्रामसेवक मधूनच निघून गेल्याने सभा अर्धवट राहिली. सभा पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी लेखी अर्जही दिला. मात्र, त्यानंतरही सभा पूर्ण झाली नसल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. अशा परिस्थितीत १७ सप्टेंबर रोजी शाळेच्या खोलीत प्रोसिडिंग बुकवर नोंदी केल्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी आक्षेप घेतला.

ग्रामसभेचे अधिकृत दस्तऐवज ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर नेण्यास परवानगी कोणी दिली? शाळेच्या खोलीत नेमक्या कोणत्या नोंदी करण्यात आल्या? त्या नोंदी ग्रामसभेत प्रत्यक्ष मंजूर झाल्या होत्या का? असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.

ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक कक्षात संगणक ऑपरेटरकडून वैयक्तिक UPI व IPPB स्कॅनरच्या माध्यमातून नागरिकांकडून विविध दाखले व प्रमाणपत्रांसाठी पैसे घेतले जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. जन्म-मृत्यू दाखले तसेच सेतू केंद्राशी संबंधित विविध कामांसाठी ग्रामपंचायतीची अधिकृत पावती न देता वैयक्तिक स्कॅनरवर पैसे स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे.

ग्रामसभेत या उत्पन्नाबाबत विचारणा झाली असता दोन वर्षांचे उत्पन्न केवळ १,८०० रुपये दाखविण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती रक्कम जमा झाली आणि ती ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाली का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

ग्रामस्थांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितल्यानंतर संबंधित RTI अर्ज संशयित ऑपरेटरच्या हाती दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर संगणक कक्षातील वैयक्तिक UPI व IPPB स्कॅनर हटविण्यात आल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. त्यामुळे या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून डिजिटल व्यवहारांचा तपशील, पावत्या आणि ग्रामपंचायतीच्या आर्थिक नोंदी तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास पंचायत समितीवर मोर्चा काढण्याचा आणि ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला या वेळी सुरज श्रावण काकडे, पंकज वसंता मेश्राम, आयुष अशोक पोटफोडे, राजेंद्र वासुदेव मेश्राम,आनंद मेश्राम,आनंदा मानवटकर, प्रफुल विनोद काकडे, किसना हरिभाऊ काकडे, अभय कवडू वाघ, नागो भुसारी, अमित सुभाष वाघ, कुणाल भोयर, गुड्डू वाघ, सुमित वाघ, निलेश गोडे, शंकर भुसारी, निखिल काकडे, अश्विन मेश्राम, नितेश दिलीप मेश्राम, सुधाकर वासुदेव मेश्राम, नितीन गौरकार, निलेश मेश्राम, सिद्धार्थ वसंत मेश्राम व समस्त तीतूर ग्रामस्थ

“संघटनेचे ग्रामसभेवर बहिष्कार असल्या कारणाने त्या सभेत माझी उपस्थिती नव्हती व माझ्या अनुपस्थितीत सभा घेण्यात आल्या कारणाने सदर प्रकरणा बाबद मला पुरेशी माहिती नाही परंतु कार्यालयीन वेळात सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.”
– माणिक मांढरे, ग्रामपंचायत अधिकारी, तितूर

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More