छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
सक्षम भारत वार्ता
नागपुर,ता.१३ : राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली असताना दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, शिष्यवृत्तीचे कारण पुढे करून काही विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केले जात होते. या प्रकाराविरोधात छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि शिक्षक भारती संघटनेने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून, राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक या तीन विद्यापीठांमधील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
नागपूर पदवीधर मतदारसंघातील शिक्षक भारतीचे उमेदवार अतुल देशमुख आणि छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिकेत घुले यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. उच्च शिक्षण सहसंचालक, नागपूर विभागाचे डॉ. संतोष चव्हाण यांनी संबंधित तिन्ही विद्यापीठांना पत्र पाठवून दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
तसेच, ज्या विद्यार्थ्यांकडून यापूर्वी परीक्षा शुल्क वसूल करण्यात आले आहे, त्या विद्यार्थ्यांची माहिती संबंधित महाविद्यालयांनी तातडीने सादर करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे यापूर्वी परीक्षा शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दुष्काळामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांवर परीक्षा शुल्काचा अतिरिक्त आर्थिक भार टाकणे अन्यायकारक आहे. सरकारने परीक्षा शुल्क माफीची घोषणा केल्यानंतर तिची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक होते. छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि शिक्षक भारती संघटनेने हा प्रश्न सातत्याने लावून धरल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबरोबरच यापूर्वी वसूल केलेले शुल्कही विद्यार्थ्यांना परत मिळावे, यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिकेत घुले आणि शिक्षक भारतीचे नागपूर पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अतुल देशमुख यांनी मांडली.
या निर्णयामुळे नागपूर, गडचिरोली आणि रामटेक येथील संबंधित विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार















