सक्षम भारत वार्ता
नागपूर , ता.30 : ऐतिहासिक ‘दीक्षाभूमी’च्या चित्राशी छेडछाड केल्याच्या निषेधार्थ आज मंगेश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यात आला. यावेळी सीताबर्डी पोलीस ठाण्यात युवक काँग्रेसच्या संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, २६ मे २०२६ रोजी नागपुरात युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा तसेच इतर सहप्रभाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेदरम्यान पदाधिकाऱ्यांच्या हातातील पत्रकावर ऐतिहासिक ‘दीक्षाभूमी’ व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले होते. मात्र, त्या चित्रामध्ये दीक्षाभूमीच्या शिखरावर भगवा ध्वज दाखविण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला.
दीक्षाभूमी हे कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचे, समतेचे आणि बौद्ध धम्माचे पवित्र प्रतीक असून, तिच्या मूळ स्वरूपाशी छेडछाड करणे म्हणजे ऐतिहासिक वास्तूचे विकृतीकरण असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. यामुळे लाखो नागरिकांच्या धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला की निष्काळजीपणामुळे घडला, याची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष मंगेश वानखेडे,राहुल दहीकर, मनोज सुटे, किशोर घोटे, विजय पाटील, हरिदास गवळी, विनोद मोहोड, तोसीफ शेख, हरीश नानवरे, वनमालाताई उके, पपीताबाई खोबरागडे, प्रतिभा घोटे, रजनी पिल्लेवान, लक्ष्मीकांत मेश्राम, राजू मेश्राम, तेलंग साहेब, विजय गोंडले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












