सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

बुद्ध विहारांना वगळले जनगणना नोंदीतील लँडमार्कमधून

-भारतीय दलित पँथरकडून आक्षेप; मंदिर, मशीद, चर्च, गुरूद्वारांचा नोंदणीत उल्लेख

सक्षम भारत वार्ता
नागपुर,ता.७ : भारत जनगणना २०२७ अंतर्गत घरयादी गट मांडणीदर्शक नकाशात वापरल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळांच्या चिन्हांमध्ये बुद्ध विहारांचा समावेश करण्यात आला नाही. यामुळे भारतीय दलित पँथरने नाराजी व्यक्त करीत जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून बुद्ध विहारांच्या नोंदणीची मागणी केली.
घरयादी चिन्हे नोंद करताना जलस्त्रोत आणि भूचिन्हे (लँडमार्क) स्तंभात मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा इत्यादींचा समावेश करण्यात आला
आहे. परंतु, बौद्ध समाजाचे वंदना स्थळ असलेल्या बुद्ध विहारांना यातून वगळले आहे. हा व्यापक षडयंत्राचा भाग असून, यामुळे राज्यातील हजारो बुद्ध विहारांच्या नोंदीच होणार नाहीत. मात्र जनगणनेत इतर धर्मीयांच्या पवित्र स्थळांच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. हा प्रकार निंदनीय असून, सरकारने तातडीने बुध्द विहारांच्या नोंदी घ्याव्या, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.प्रसंगी न्यायालयीन लढा देण्यात येईल, असा इशारा भारतीय दलित पँथरचे प्रकाश बनसोड यांनी दिला आहे.
जनगणना नोंदीतील या प्रकारामुळे बुद्ध विहारे शासन अभिलेखापासून वंचित ठेवण्यात येत आहे, अशी भीती बौद्ध समाजात पसरली असून असंतोष वाढत आहे. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी सचिन गोसावी यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात प्रकाश बन्सोड, डॉ. प्रबोधन मेश्राम, गुलाब डोंगरे, सागर गजभिये, मधुकर गवळी, दिनेश बनसोड, अरूण चुनारकर आदी उपस्थित होते.

“बौद्धांच्या धम्म स्थळांची दखल जनगणनेत नघेतल्यास महाराष्ट्रातील बौद्धांवर अन्याय होईल. केंद्र सरकारने नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी अॅक्ट -१९९२ अंतर्गत बौद्ध समुदायांना राष्ट्रीय स्तरावर व महाराष्ट्र राज्यात अल्पसंख्यांक म्हणून अधिसूची (नोटिफाय) केली आहे. त्यामुळे बुद्ध विहारांना यातून वगळणे घटनाविरोधी कृत्य मानले जाईल.”
– प्रकाश बनसोड, अध्यक्ष-भारतीय दलित पँथर, नागपूर.

देशातील ७२.३६ टक्के बौद्ध राज्यात राज्यात बौद्ध नागरिकांची लोकसंख्या ६६ लाख ३१ हजार २०० आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ५.८१ टक्के आहे. महार बौद्धांची एकत्रित संख्या एक कोटीवर आहे. १० ते १२ टक्के आहे. भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ७२.३६ टक्के बौद्ध महाराष्ट्रात आहेत. नागपूर शहरात बौद्धांची लोकसंख्या ८६,८५० इतकी म्हणजे १४.३६ टक्के आहे. नागपुरातच ४५० बुद्धविहारे आहेत.

Leave a Comment

Read More