सक्षम भारत वार्ता
नवी दिल्ली | प्रतिनिधी : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. त्यानंतर शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून स्वीकारली होती. गुणवंत विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही, हा माझा निर्धार होता. फेरपरीक्षेचा निकाल लागल्यानंतर गरीब व पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही यश मिळाले.”
ते पुढे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या दिशाभूल होऊ नये यासाठी जबाबदार पदांवरील काही व्यक्तींनी अडथळे आणले, त्यामुळे मन व्यथित झाले. भारताची तरुण पिढी ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. सध्याच्या परिस्थितीचा देशविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये आणि देशाची एकता अबाधित राहावी, यासाठी मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.”
धर्मेंद्र प्रधान हे २०२१ पासून केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, पोलाद तसेच कौशल्य विकास यांसारखी महत्त्वाची मंत्रालयेही सांभाळली आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आला असून, पुढील शिक्षणमंत्र्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.












