नागेश्वर नगर ‘बी’ परिसरातील नागरिक त्रस्त; तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी
सक्षम भारत वार्ता
बिडगाव ता. ०१ : नगरपंचायत बिडगाव-पांडूर्णा-तरोडी खुर्द अंतर्गत येणाऱ्या बिडगाव येथील नागेश्वर नगर ‘बी’ परिसरात गेल्या पाच दिवसांपासून नळाला पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या तसेच दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून, मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पाच दिवसांपासून नळ कोरडे असल्याने नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घरगुती वापरासाठीही पाणी उपलब्ध होत नसल्याने महिलांसह नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. पाणीपुरवठा योजनेअंतर्गत काम सुरू असतानाही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पाणीपुरवठ्यातील अडथळा दूर करावा आणि नागेश्वर नगर ‘बी’ परिसरातील पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
रामा डॅम जिथून पाणी पुरवठा होतो तिथेच इलेक्ट्रिक बिघाड आल्या कारणाने नागेश्वर नगरच नाही तर संपूर्ण बिडगांव मधे पाण्याची समस्या निर्माण झाली मात्र आता समस्या दूर झालेली असून नागरिकांना नियमित पाणी मिळणार आहे.
प्रिया आशिष मल्लेवर,सभापती पाणीपुरवठा व जालनिस्सार समिती. न. प. बिडगाव
समस्या आहे म्हणून नागरिकांनी घाबरून जाऊ नये समस्या जास्त काळ टिकणारी नाही समसेच निवारण झालेले असून काही भागात पाणी पुरवठा सुरू झालेला आहे व सर्वच परिसरात पाणीपुरवठा नियम होणार.
विरू जामगडे, नगराध्यक्ष, न प बिडगांव.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार
















