सक्षम भारत वार्ता
बहादुरा, ता.६ : माननीय पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तसेच माननीय पोलीस उपायुक्त (झोन-४) रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली अनामिका मिर्झापुरे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन हुडकेश्वर यांनी “पोलीस आपल्या दारी” उपक्रमांतर्गत अड्याळी गावात जनसंवाद बैठक आयोजित करण्यात आली.

नागरिक व पोलीस यांच्यातील समन्वय अधिक दृढ व्हावा, नागरिकांच्या समस्या त्यांच्या गावात जाऊन जाणून घेता याव्यात व त्यांचे तात्काळ निवारण व्हावे या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात आला.
बैठकीस गावातील नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांच्या विविध समस्या, तक्रारी व सूचना ऐकून घेण्यात आल्या. प्राप्त तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले तसेच आवश्यक त्या प्रकरणांमध्ये कायदेशीर मार्गदर्शन देण्यात आले.
बैठकीदरम्यान नागरिकांना सायबर गुन्हे प्रतिबंध, महिला सुरक्षा, अमली पदार्थ विरोधी जनजागृती, अवैध धंद्यांवर नियंत्रण, ,चोरी,वाहतूक नियमांचे पालन व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
उपस्थित नागरिकांनी “पोलीस आपल्या दारी” या उपक्रमाचे स्वागत करून पोलीस प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले व भविष्यातही सहकार्य करण्याची ग्वाही दिली.












