सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

निर्मल नगरीत संत गजानन महाराज मंदिराची स्वप्नपूर्ती; स्व.प्रभाकर राऊतदादांचे योगदान अविस्मरणीय- देवराव प्रधान

निर्मल नगरीत संत गजानन महाराज मंदिराची स्वप्नपूर्ती; स्व.प्रभाकर राऊतदादांचे योगदान अविस्मरणीय- देवराव प्रधान

सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता. 31 : उमरेड मार्गावरील निर्मल नगरी येथील श्री संत गजानन मंदिरात देवराव प्रधान व त्यांच्या पत्नींचा सत्कार सुनील बालपांडे यांच्या हस्ते करण्यात आला त्या प्रसंगी देवराव प्रधान यांनी सांगितले की, निर्मल नगरी येथील श्री संत गजानन मंदिर हजारो भक्तांचे श्रद्धास्थान बनले असून या भव्य-दिव्य मंदिराच्या उभारणीत स्व.प्रभाकरराव राऊत यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे संत गजानन महाराजांचे सुंदर व आकर्षक मंदिर उभे राहिले असून नागपूरातील “शेगावप्रती” म्हणून या परिसराची ओळख निर्माण झाली आहे. रघुजी नगर पोलीस क्वार्टर परिसरातील श्री संत गजानन महाराज मठात 1983 ते 2017 या कालावधीत सलग 35 वर्षे श्रींचा प्रकटदिन उत्सव साजरा करण्यात येत होता. त्यानंतर 2018 पासून निर्मल नगरीतील नव्या भव्य मंदिरात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मंदिर परिसरात संत गजानन महाराजांच्या मूर्तीसह विविध देवतांच्या आकर्षक मूर्ती स्थापित करण्यात आल्या तसेच पारायण कक्ष, साधना कक्ष, ध्यान कक्ष आणि श्रींचे विश्रामस्थळ यांचाही समावेश मंदिरात करण्यात आला आहे. मंदिर हे दररोज सकाळी 6 ते रात्री 9-10 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असतात. प्रत्येक गुरुवारी सायंकाळच्या आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते, तर एकादशीला नियमितपणे भजन केले जातात. आध्यात्मिक जीवनात सद्गुरूंचे महत्त्व अधोरेखित करताना मंदिर व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, देवाला शरण गेल्यास संपत्ती व समृद्धी मिळते, मात्र सद्गुरूंना शरण गेल्यास भगवंताची प्राप्ती होते. “सद्गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही,” हा संदेश मंदिरातील विविध उपक्रमांतून दिला जातो. स्व. प्रभाकर राऊत यांच्या स्मरणार्थ मंदिरात वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये प्रकटदिन उत्सव, पुण्यतिथी, श्रीराम नवमी, गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी, नागपूर- शेगाव व नागपूर- कोराडी दिंडी यात्रा, जळगाव जामोद- शेगाव पालखी यात्रा तसेच दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सामूहिक पारायण मंडळाचे आयोजन केले जाते. याशिवाय आरती, भजन, भक्ती सत्संग यांसारखे कार्यक्रम नियमितपणे पार पडतात. मंदिराच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यात ट्रस्टचे पदाधिकारी, सेवेकरी आणि भक्तगण सातत्याने योगदान देत असून त्यांच्या सेवाभावामुळे निर्मल नगरीतील संत गजानन महाराज मंदिर हे नागपूरच्या आध्यात्मिक जीवनातील एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. गुरुवारी निर्मल नगरीत देवराव प्रधान व त्यांच्या पत्नींचा सत्कार करतेवेळी श्री सुनील दादा बालपांडे, सुरेश रोकडे, राजकुमार चोपकर, मोहनदादा वैरागडे आणि दिपक प्रभाकर राऊत यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

Read More