सक्षम भारत वार्ता
नागपुर ,दि. २१ जुलै : उमरेड येथील उपविभागीय अधिकारी (एस.डी. ओ.) कार्यालयात कार्यरत असलेल्या मेहर बाबू यांनी ७५ वर्षीय ज्येष्ठ महिला श्रीमती मालन आसाराम माटे यांच्याशी अपमानास्पद व असंवेदनशील वर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची वस्तुस्थिती मांडण्यासाठी अँड. भीमराव शेंडे यांच्या वतीने सोमवारी २० जुलै रोजी नागपूरला पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीमती मालन माटे या गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या जमिनीच्या हक्कासाठी न्यायालयीन आणि प्रशासकीय लढा देत आहेत. त्याच अनुषंगाने एस. डी. ओ. कार्यालयात सुनावणी दरम्यान उपस्थित असताना मेहर बाबू यांनी त्यांना, “तुम्ही म्हाताऱ्या आहात, किती वर्षे जगणार ? जमीन कशाला मागता ? चार- पाच वर्षांत मरणार आहात, जमीन मुलींना देऊन टाका,” अशा स्वरूपाचं अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे ज्येष्ठ महिलेच्या मनावर गंभीर मानसिक परिणाम झाला असून, त्यांच्या मनात भीती व धास्ती निर्माण झाली आहे. एखाद्या ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेला अशा प्रकारे अपमानास्पद भाषेत बोलण्याचा अधिकार मेहर बाबूंना कोणी दिला? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. श्रीमती मालन माटे यांनी आपल्या जमिनी बाबत न्याय मिळेल किवा नाही, आपल्या जमिनीचा हक्क कायम राहील की नाही, याबाबतीत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या मानसिक तणावामुळे त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम झाल्याचे सांगण्यात आले आहे.
पत्रपरिषदेत या संपूर्ण प्रकरणातील कागदपत्रे, घडलेल्या घटनाक्रमाची माहिती तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत सविस्तर खुलासा करण्यात येणार असून, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखत दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
ॲड.भीमराव शेंडे,ॲड. विष्णु पानतावणे,
अँड. राजेंद्र मेश्राम एम. डी. भिलावे आणि अँड. शेषराव माटे, मालन माटे यांची पत्रकार परिषदेत उपस्थिती होती.












