सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता. २ : केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम हाती घेतला आहे. २० जूनपासून याचे काम सुरू होणार असून त्यापूर्वी मतदार याद्यांची तपासणी करायची आहे. हे काम करण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांविरोधात कारवाईसाठी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चारही बीएलओ अंगणवाडी सेविका, मदतनीस असून काटोल विधानसभा मतदार संघातील आहे. यापूर्वीही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांकडे त्यांची सुनावणी सुद्धा झाली. त्यानंतरही ते एसआयआरचे काम करण्यास तयार झाले नसल्याने आता काटोल पोलिसांकडे चारही बीएलओंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विभाग प्रमुखांकडे निलंबनाचा प्रस्ताव सादर
एसआयआरच्या कामात रुजू न होणाऱ्या शिक्षकांसह इतर अशा सुमारे तीसहून अधिक कर्मचाऱ्यांच्या निलंबनाने प्रस्ताव संबंधित विभाग प्रमुखांकडे पाठविण्यात आले आहेत. सोबतच विधानसभानिहाय सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (एईआरओ) यांना अशांविरोधात पोलिसात तक्रारीच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.












