निर्भीड, निस्वार्थ आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण अभिवादन
34 वर्षांपूर्वीची आठवण; माझ्या जीवनातील आधारस्तंभ: जेष्ठ पत्रकार दासु गोल्हर
सक्षम भारत वार्ता
नागपूर,(दि.१५ जुलै २०२६) यवतमाळ जिल्ह्यातील धनज (माणिकवाडा) येथील ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भगवंत गोल्हर उर्फ दासु यांचा जन्म ६ सप्टेंबर १९४० रोजी झाला. पत्रकारितेतील प्रामाणिकपणा, निर्भीड भूमिका आणि सहकाऱ्यांप्रती असलेली आत्मीयता यामुळे त्यांनी नागपूरसह राज्याच्या पत्रकारिता क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले. दीक्षाभूमी परिसरातील वसंतनगर, पत्रकार कॉलनी येथील राहत्या घरी २ जुलै २०२६ रोजी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व हरपले आहे. टी. बी. गोल्हर यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात नागपूर टाइम्समधून केली. त्यानंतर त्यांनी देशातील प्रतिष्ठित वृत्तसंस्था युनायटेड न्यूज ऑफ इंडिया (UNI) मध्ये कार्य करत आपल्या लेखणीची छाप राष्ट्रीय पातळीवर उमटविली. १९७३ मध्ये त्यांचा विवाह झाला. पत्रकारितेबरोबरच पत्रकार संघटनांच्या बळकटीसाठी त्यांनी आयुष्यभर योगदान दिले. नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे ते १९७८ वर्षी अध्यक्ष झाले. त्यानंतर १९९५ ते १९९९ या कालावधीतही त्यांनी अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे नेतृत्व केले. पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करतांना संघटनेला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. टिळक पत्रकार भवन ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर २००६ मध्ये ते ट्रस्टचे अध्यक्ष राहीले होते.
पत्रकारांसाठी कायमस्वरूपी वास्तू, संघटनात्मक मजबुती आणि पत्रकार कल्याणासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या मागे सर्वश्री त्यांचे परम मित्र प्रदीप कुमार मैत्र, (दादा) जोसेफ राव, रामू भागवत, विश्वास इंदूरकर आणि ट्रस्टचे सरचिटणीस शिरीष बोरकर या सर्वांनी वेळो वेळी त्यांना साथ दिली. हे विशेष: मास कम्युनिकेशन विभागाचे के जी मिसर हे 1993 च्या सुमारास अधिकारी म्हणून होते. त्यावेळी टी. बी. गोल्हर पत्रकारितेचे वर्ग घेत होते एवढे मला आठवते. गोल्हर साहेबांनी अनेक गरजू व्यक्तींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. संकटात आधार दिला. आणि अनेकांचे आयुष्य घडवले. असे ते गोल्हर साहेब होते. त्यांच्या कार्याचा लाभ अनेक होतकरू युवकांना झाला. त्यापैकी एक म्हणजे देवराव प्रधान. मूळचे धनज – माणिकवाडा येथील देवराव प्रधान सांगतात की, “मी अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा होतो. सन १९९३ मध्ये टी.बी.गोल्हर साहेबांनी मला नागपूर शहरातील UNI कार्यालयात नोकरी मिळवून दिली. माझे संपूर्ण नाव देवराव शंकरराव प्रधान असे आहे. त्यांनी मला DSP पदवी बहाल केली होती त्यांच्यामुळेच मी DSP म्हणून ओळखला जातो. परंतु दहा वर्षानंतर मला 2002 साली. दिल्ली UNI मॅनेजमेंटच्या आदेशानुसार कामावरून कमी करण्यात आले होते. त्यानंतर मला गोल्हर साहेब व त्यांचे परम मित्र प्रदीपकुमार मैत्र साहेब (दादा) यांनी पुन्हा २००६ मध्ये टिळक पत्रकार भवन ट्रस्टमध्ये क्लर्क म्हणून रुजू होण्याची संधी दिली. आज मी नागपूर श्रमिक पत्रकार संघात क्लर्क म्हणून कार्यरत आहे. हे सर्व त्यांच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले. आज मी जे काही आहे त्यामध्ये गोल्हर साहेबांनी दिलेली संधी त्यांचा विश्वास आणि त्यांचे मार्गदर्शन, त्यांनी माझ्यावर केलेले उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. कारण ते माझे आधारस्तंभ होते. तो एक काळ होता ज्यात पत्रकारांना आपली मुलगी देणे म्हणजे एका प्रकारे धोका पत्करणे असा गैरसमज मुलींच्या पालकांमध्ये होता. मात्र, गोल्हर साहेबांनी ज्या प्रकारे माझ्या पत्रकारितेला आकार दिला. त्याचप्रमाणे माझ्या करिता जीवनसंगिनी शोधून माझ्या आयुष्याला नवी दिशा दिली. आज मी माझ्या संसारात, कुटुंबात, सुखी व समाधानी आहे. त्याचे कारण म्हणजे टी बी गोल्हर साहेब. अनेक गरजू युवकांना त्यांनी दिलेला आधार हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.”
पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे, हा विचार टी.बी.गोल्हर यांनी आपल्या कार्यातून जपला. त्यांची प्रामाणिकता, स्पष्टवक्तेपणा, संघटन कौशल्य आणि माणुसकीची जपणूक यामुळे ते पत्रकारांसाठी कायम प्रेरणास्थान राहतील. आज बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी त्यांच्या ‘चौदावी विधी ‘ चे आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे. पत्रकार बंधु, मित्रपरिवार व हितचिंतकांनी उपस्थित राहून ज्येष्ठ पत्रकार टी बी गोल्हर यांना आदरांजली अर्पण करावी. स्व. तुळशीदास भगवंत गोल्हर यांचे कार्य व स्मृती पत्रकारिता क्षेत्राला सदैव प्रेरणा देत राहतील. त्यांच्या या सामाजिक जाणीवतेचा आणि माणुसकीचा मी स्वतः साक्षीदार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
देवराव प्रधान (DSP)
टिळक पत्रकार भवन धंतोली नागपूर












